जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) घरातून निघून गेलेला गतिमंद शिवा आढाव पाटील अखेर बुधवारी (७ ऑक्टोबर) दुपारी १.४० वाजता हिवरखेड-सौंदळा रस्त्यावर सुखरूप सापडला. जळगाव डेपोचे कंडक्टर एस. आर. गावंडे यांच्या सतर्कतेमुळे शिवाचा शोध लागला.
शिवा ६ ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याचे वडील शेजारी राहणारे देशोन्नती प्रतिनिधी विनोद चिपडे यांच्या घरी आले व शिवा घरी आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर विनोद चिपडे यांनी तात्काळ शिवाचा शोध घेण्यासाठी मेसेज तयार करून व्हॉट्सअॅप, फेसबुकसह सोशल मीडियावर प्रसारित केला. रात्री उशिरापर्यंत विविध माध्यमांतून माहिती पोहोचवून शिवाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्यात आले. पोलीस, एसटी कर्मचारी, ट्रान्सपोर्टशी संबंधित व्यक्ती आणि नागरिकांनाही माहिती देण्यात आली.
दरम्यान, आज बुधवारी जळगाव डेपोची बस हिवरखेड-सौंदळा मार्गावर जात असताना कंडक्टर एस. आर. गावंडे यांना शिवा दिसला. त्यांनी तात्काळ बस थांबवून शिवाला सुरक्षित घेतले. त्याला जळगावला आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच शिवाचे वडील त्याचा शोध घेत तेथे पोहोचले आणि शिवाला सुखरूप घरी आणण्यात आले.
सर्वांच्या सहकार्याने शिवाचा शोध यशस्वी झाल्याने कुटुंबीयांनी एस. आर. गावंडे यांच्यासह शोधकार्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.




Total Users : 3572649