बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पांगरी-हातेडीतील कार्यक्रमानंतर सुरू झालेला शाब्दिक संघर्ष आता महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून अधिक तीव्र झाला आहे. महिलांना उचलून नेण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप फेटाळताना आमदार संजय गायकवाड यांनी महिलांच्या रक्षणासाठी केलेल्या कामाचा दाखला दिला. त्यावर आमदार श्वेता महाले यांनी थेट त्यांच्या शिवसैनिकांच्या कुटुंबातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत जोरदार पलटवार केला.
“आरोप करण्यापूर्वी माझा इतिहास पाहावा. महिलांच्या रक्षणासाठी मी रक्त सांडलं, तलवारी अंगावर घेतल्या. सात हजार मुलींचे संसार बसवले,” असा दावा गायकवाड यांनी केला. मुलींबाबत अडचण आली की पालक पोलीस ठाण्याऐवजी आपल्या कार्यालयात येतात, इतका त्यांचा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. बुलढाण्यात रात्री बारालाही तरुणी एकटी फिरू शकते, असे म्हणत त्यांनी आपल्यावरील आरोपांवर नाराजी व्यक्त केली.
या वक्तव्याला उत्तर देताना महाले म्हणाल्या, “बुलढाण्यातल्या सर्वसामान्य मुलींबद्दल बोलण्याआधी तुमच्या मतदारसंघातील शिवसैनिकांच्या घरातल्या महिला सुरक्षित आहेत का, हे तपासा. त्यांना कोण मेसेज करतो, हेही पाहा. ते समोर आलं तर शिवसैनिकांसमोर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.” महालेंनी नेमका कोणावर आरोप केला, याचा तपशील मात्र त्यांच्या वक्तव्यात दिलेला नाही.
गायकवाड यांच्या महिला सुरक्षेसाठीच्या कामाच्या दाव्यावरही महालेंनी टोला लगावला. “कामाची पावती स्वतः द्यावी लागत नाही; ती जनता देते,” असे त्या म्हणाल्या. महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांनी गायकवाड यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले. “दुसऱ्यांच्या बुद्धीची कीव करण्याआधी स्वतःची बुद्धी तपासावी,” असा प्रतिटोलाही त्यांनी लगावला.
आपल्या चिखली मतदारसंघात विविध पक्षांचे कार्यकर्ते समन्वयाने काम करतात, असे सांगत महालेंनी बुलढाण्यातील राजकीय वातावरणावर टीका केली. बोगस मतदानाच्या मुद्द्यावरही त्यांनी गायकवाड यांना लक्ष्य केले. विरोधकांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या शंकेला गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे बळ मिळाल्याचा दावा करत, “मग त्याच बोगस मतदारांच्या जोरावर आमदार आणि नगराध्यक्ष निवडून आले असतील का?” असा सवाल त्यांनी केला. महाले यांच्या ‘मेसेजेस’विषयीच्या आरोपामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे. आता त्या आरोपावर गायकवाड काय उत्तर देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3527974