spot_img
spot_img

BIG CRIME UPDATE | ट्रक अडवला, चालकाला बेदम मारलं अन् कांद्यासह 36.50 लाखांचा मुद्देमाल घेऊन फरार; डोणगाव पोलिसांचा चौघांवर शिकंजा!

मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) समृद्धी महामार्गावर रात्रीच्या अंधारात ट्रकचालकाला अडवून मारहाण करत तब्बल 36 लाख 50 हजार रुपयांचा ट्रक आणि कांद्याचा माल पळवून नेल्याच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात डोणगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चार आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील कौसंबी जिल्ह्यातील मिराज अहमद ऐजाज अहमद हा चालक गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून रायपूर येथील रोडलाईन कंपनीचा CG-04-PP-9113 क्रमांकाचा ट्रक चालवत होता. 25 सप्टेंबर रोजी तो आपल्या सहकाऱ्यासह तब्बल 30 टन 560 किलो कांदा घेऊन समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने निघाला होता.

रात्री सुमारे 11.30 वाजता मेहकर-मालेगावदरम्यान डोणगाव परिसरातील भारत पेट्रोलपंपाजवळ पांढऱ्या रंगाच्या MH-15-HU-9004 क्रमांकाच्या कारमधून आलेल्या चार इसमांनी ट्रक अडवल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. तक्रारीनुसार, चालकाला जबरदस्तीने खाली उतरवत मारहाण करण्यात आली. त्यानंतर 25 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि सुमारे 11 लाख 50 हजार रुपयांचा कांदा, असा एकूण 36 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 317/2026 अन्वये BNS कलम 309(6), 126 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि संशयितांचा माग काढत चौघांना ताब्यात घेत अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये गौरव हरिभाऊ पानसरे (वय 29, रा. पतरशेमबी, नाशिक), विषवजीत निवृत्ती ठोमसे (वय 30, रा. पंचकेश्वर, निफाड), तेजस विलास ठोमसे (वय 20, रा. बोरथान, ता. निफाड) आणि अशुदेब गोबींदो दास (वय 32, रा. कोलकाता) यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

रात्रीच्या महामार्गावर ट्रक अडवून लाखोंचा माल पळवण्याच्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, पळवलेला ट्रक व कांद्याचा माल कुठे नेण्यात आला, तसेच संपूर्ण कटामागे नेमके कोण आहे, याचा छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.या प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार API इंगोले करीत आहेत

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!