डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) शेगावीचा राणा म्हणून जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पावन पदस्पर्शाने बुलढाणा जिल्ह्यातील डोणगावही धन्य झाल्याची श्रद्धा आजही येथे जपली जाते. तब्बल १०३ वर्षांपूर्वी, १९२३ मध्ये संत गजानन महाराज डोणगावातील गोविंद शास्त्री पिंपरकर यांच्या घरी आले होते, आणि त्यांच्या साक्षीने अंगणात स्थापन करण्यात आलेली श्री गणेशाची मूर्ती आजही तितक्याच श्रद्धेने विराजमान आहे.
शेगावपासून सुमारे ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणगावातील हा वारसा पिंपरकर कुटुंबाने पिढ्यान्पिढ्या जतन केला आहे. संत गजानन महाराजांनी गोविंद शास्त्री यांच्या घरी विश्रांती घेतल्याचे आणि त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत गणेशमूर्तीची स्थापना झाल्याचे कुटुंबीय सांगतात.
विशेष म्हणजे, गजानन महाराजांच्या डोणगाव भेटीचा प्रसंग श्री गजानन ग्रंथाच्या अध्याय क्रमांक १९ मधील ओव्यांमध्ये असल्याचेही सांगितले जाते. गोविंद शास्त्री हे महाराजांचे परमभक्त होते.
महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर शेगाव येथे गोविंद शास्त्री उपस्थित होते. महाराजांच्या मस्तकावर ठेवलेला लोण्याचा गोळा वितळल्याचा प्रसंग संजीवन समाधीचे प्रमाण मानला गेला, अशी माहिती त्यांचे वंशज मुकुंद पिंपरकर यांनी दिली.
आजही या अंगणात भक्त नित्यनियमाने दर्शनासाठी येतात. श्री गणेशाच्या दर्शनासोबतच संत गजानन महाराजांच्या पावन स्मृतींचाही भाविकांना येथे अनुभव येतो











Total Users : 3500392