चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) तालुक्यातील मंगरूळ नवघरे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमडापूर पोलिसांनी तडीपारीची मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता किसन मठारकर (वय ३७, रा. मंगरूळ नवघरे) याच्याविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात अनेक दखलपात्र गुन्हे नोंद असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप तोंडे यांनी संबंधित इसमाचा तडीपारीचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे पाठविला. या प्रस्तावावर सुनावणी व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांनी दत्ता किसन मठारकर याला दोन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आदेश प्राप्त होताच अमडापूर पोलिसांनी कारवाईला वेग दिला. २० सप्टेंबर २०२६ रोजी सहाय्यक फौजदार दिलीप तोंडे आणि पोलीस अंमलदार समाधान झिने यांनी संबंधित तडीपार इसमाला बुलढाणा जिल्ह्याबाहेर नेऊन पोलीस स्टेशन जाफराबाद, जिल्हा जालना येथे सोडले.
या कारवाईमुळे मंगरूळ नवघरेसह अमरापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी तडीपारीसारख्या प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही सुरू राहण्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.
अमडापूर पोलिसांचा ‘तडीपारी पॅटर्न’ चर्चेत आला असून, कायदा हातात घेणाऱ्यांना आता थेट जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखवला जाणार का? याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3499272