spot_img
spot_img

CRIME NEWS! शाळाच फोडली! 7 वर्गखोल्या अन् कार्यालयात चोरट्यांचा धुमाकूळ; LED फोडले, CCTV उखडले, पोषण आहारही लंपास!

सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा) ज्ञानमंदिरालाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना सिंदखेड राजा तालुक्यातील जउळका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या तब्बल सात वर्गखोल्या आणि कार्यालयात घुसून इलेक्ट्रॉनिक साहित्याची तोडफोड केली, तर संगणकाचे CPU, CCTV कॅमेरे, DVR, प्रोजेक्टरचे सिस्टम सेटअप, UPS, क्रिकेट किट, बॅटऱ्या आणि शालेय पोषण आहारातील धान्य असा सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची फिर्याद किनगाव राजा पोलिसांत दाखल झाली आहे.

 

मुख्याध्यापक महेश सुभाष नागरे यांच्या फिर्यादीनुसार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शाळा सुटल्यानंतर सर्व खोल्या बंद करून शिक्षक गावी गेले होते. मात्र २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता शालेय समिती अध्यक्षांना शाळेच्या खोल्या उघड्या आणि साहित्याची नासधूस झाल्याचे आढळले.

मुख्याध्यापकांनी शाळेत पोहोचून पाहणी केली असता कार्यालयातील CPU, CCTV DVR तसेच विविध वर्गखोल्यांतील कॅमेरे चोरीला गेल्याचे दिसले. अनेक LED टीव्ही फोडण्यात आले, तर प्रोजेक्टर सिस्टम, UPS, क्रिकेट किट आणि दोन बॅटऱ्यांवरही चोरट्यांनी हात साफ केला.

धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शालेय पोषण आहारालाही सोडले नाही. तूरडाळ, मसूरडाळ, मूगडाळ, मटकी, वाटाणा, तेलाची २४ पाकिटे आणि मसाल्याचे साहित्यही चोरीला गेले.

या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध BNS कलम 334(1), 305(A), 324(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू मुंढे करीत आहेत

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!