देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) धर्माच्या नावावर भिंती उभ्या करणाऱ्यांना थेट उत्तर देणारा आणि सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून देणारा प्रेरणादायी प्रसंग देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. येथील मानाचा आणि भाविकांचा लाडका ‘छत्रपती नगरचा राजा गणेश मित्र मंडळ’ यंदा केवळ गणेशोत्सव साजरा करून थांबले नाही, तर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जिवंत संदेश संपूर्ण परिसराला दिला.
मंडळाने मुस्लिम समाजातील निसार पठाण यांना सपत्नीक गणरायाच्या आरतीचा मान देत सामाजिक एकतेचा सुंदर अध्याय लिहिला. पठाण दाम्पत्याने भक्तिभावाने बाप्पांची आरती केली, तर उपस्थित हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला. त्या क्षणी धर्म, जात आणि पंथाच्या सीमा मागे पडल्या आणि ‘माणुसकी हाच सर्वांत मोठा धर्म’ हा संदेश ठळकपणे समोर आला.
विशेष म्हणजे हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता गावाच्या सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला. आज समाजात किरकोळ कारणांवरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रकार दिसत असताना, सिनगाव जहागीरने मात्र एकतेचा मार्गच खरा उत्सव असल्याचे कृतीतून दाखवून दिले.
या उपक्रमासाठी मंडळाचे युवा नेते योगेश मिसाळ, अध्यक्ष ओमराजे पवार, उपाध्यक्ष बाळू बंगाळे यांच्यासह अमर उडानशिव, चेतन बंगाळे, गजानन बंगाळे, राहुल गोरे, कुलदीप बंगाळे, राजू म्हस्के, सचिन बंगाळे, अरुण बोबडे, भगवान बोबडे, गणेश बंगाळे, मंगेश इंगळे, समाधान मोहिते, विठ्ठल वाघमारे व सर्व कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे











Total Users : 3494161