बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एखादी व्यक्ती अचानक बेपत्ता झाली की पोलिस ठाण्यात केवळ ‘मिसिंग’ची नोंद करून दिवस ढकलण्याची पद्धत आता चालणार नाही! बेपत्ता व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असेल, अपहरणाचा संशय निर्माण होत असेल किंवा परिस्थिती संशयास्पद असेल तर तातडीने गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवावी लागणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पोलिस प्रशासनाला प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिल्याने बेपत्ता प्रकरणांकडे पाहण्याची पोलिसांची पद्धत बदलण्याची चिन्हे आहेत.
यापूर्वी अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता प्रकरणांत अपहरणाचा गुन्हा तातडीने दाखल होत असे; मात्र प्रौढ व्यक्ती बेपत्ता झाल्यास अनेकदा ‘मिसिंग’ नोंद करून शोध सुरू केला जात होता. आता वय आणि लिंग न पाहता प्रत्येक तक्रारीतील परिस्थिती, संशय आणि उपलब्ध पुरावे गांभीर्याने तपासावे लागणार आहेत.
मोबाइल लोकेशन, CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड, प्रवासाची माहिती आणि संपर्कातील व्यक्ती सगळ्यांची तपासणी सुरुवातीच्या तासांतच! कारण बेपत्ता व्यक्तीच्या शोधातील पहिले काही तास म्हणजेच ‘गोल्डन अवर्स’ अत्यंत निर्णायक मानले जातात.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात सात महिन्यांत अपहरण व पळवून नेण्याचे १३७ गुन्हे नोंदले गेले असून, मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा १०९ होता. म्हणजेच तब्बल २८ प्रकरणांची वाढ झाली आहे. यातील ११७ प्रकरणांचा तपास पूर्ण झाल्याची माहिती आहे.











Total Users : 3466738