मुंबई (वृत्तसंस्था/हॅलो बुलढाणा) गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले आणि श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. मात्र बाप्पाची आरती संपल्यानंतर झालेल्या चर्चेने या सदिच्छा भेटीला अचानक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले!
आमदार श्वेता महाले पाटील तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे मुख्यमंत्र्यांनी विधिवत पूजन केले. आमदार महाले यांनी घराच्या उंबरठ्यावर त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्याधर महाले आणि राजन्य महालेही उपस्थित होते.
पण खरी चर्चा दर्शनानंतर रंगली. चिखली विधानसभा मतदारसंघसह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिके संकटात आली असून पाणीटंचाई, उत्पादनातील संभाव्य घट आणि शेतकऱ्यांवरील वाढते आर्थिक संकट आमदार महाले यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
“परिस्थिती गंभीर आहे; शेतकरी आणि नागरिकांना तातडीचा दिलासा मिळायला हवा,” अशी ठाम भूमिका घेत त्यांनी शासकीय मदत आणि आवश्यक उपाययोजनांची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण परिस्थिती गांभीर्याने ऐकून घेत आवश्यक कार्यवाहीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. त्यामुळे आता जिल्ह्यात एकच चर्चा बाप्पाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा ‘मोठा शब्द’ प्रत्यक्ष मदतीत कधी उतरणार? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून लवकरच मोठी घोषणा होणार का?













Total Users : 3465527