spot_img
spot_img

EXCLUSIVE कागदावर नसबंदी, रस्त्यावर कुत्र्यांचे कळप!चिखली पालिकेची प्रत्येक कुत्र्यामागे १,९२५ रुपयांची उधळपट्टी कशासाठी?महापालिकेपेक्षाही जास्त दर; तरी रस्त्यावर परिणाम शून्य! सीओ साहेब, जनतेच्या पैशांचा हिशेब देणार की कंत्राटदाराची पाठराखण करणार?

चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) शहरातील छत्रपती संभाजीनगर येथे अवघ्या पाच वर्षांच्या आयांश सुरडकरवर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर चिखलीतील कुत्रे नसबंदी मोहिमेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर असताना नगर परिषद मात्र प्रत्येक कुत्र्यामागे तब्बल १,९२५ रुपये मोजत असल्याची माहिती समोर आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार मोठ्या महानगरपालिकांमध्ये कुत्रा पकडणे, नसबंदी, लसीकरण, काही दिवस देखभाल आणि पुन्हा सोडणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण १,२०० ते १,६०० रुपये खर्च होत असल्याचे नमूद केले जाते. मग चिखली नगर परिषदेने भोकरदन येथील वेदिका अॅनिमल वेल्फेअर एजन्सीला १,९२५ रुपयांचा दर नेमक्या कोणत्या निकषावर मंजूर केला?

एवढा दर मोजल्यानंतरही शहरातील चौक, बाजारपेठा आणि गल्लीबोळांत भटक्या कुत्र्यांचे कळप दिसत असतील, तर कामाचे प्रत्यक्ष परिणाम कुठे आहेत? नसबंदी झालेल्या प्रत्येक कुत्र्याची ओळख, छायाचित्रे, उपचार नोंद, लसीकरण तपशील आणि प्रत्यक्ष पडताळणी झाली का?

सीओ साहेब, फक्त बिलांवर सही करणे म्हणजे प्रशासन नाही! नागरिकांच्या पैशातील प्रत्येक रुपयाचा हिशेब देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. कंत्राटदाराला महापालिकेपेक्षा जास्त दर का? दर मंजुरीची फाईल, निविदेतील स्पर्धा आणि प्रत्यक्ष कामाचे फिजिकल ऑडिट सार्वजनिक करा.१,९२५ रुपये कुत्र्यामागे खर्च करूनही आयांशसारख्या चिमुकल्यांना रस्त्यावर सुरक्षितता नसेल, तर ही नसबंदी मोहीम जनतेसाठी आहे की फक्त कंत्राटाच्या बिलांसाठी?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!