सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) लगतच्या देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचखेड, खळ्याळ गव्हाण आणि परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे अक्षरशः दहशतीचे सावट पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थ भयभीत झाले असून आता जनावरांवरील हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप नऱ्हेराव यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला फाडल्याची घटना घडली. यानंतर दीपक वायाळ यांच्या शेतातही बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पिकांपेक्षा स्वतःचा आणि जनावरांचा जीव वाचविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
ग्रामस्थांचा थेट सवाल आहे बिबट्याने आणखी एखादा हल्ला केल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का? केवळ गस्त घालून कागदोपत्री उपाय करण्याऐवजी वन विभागाने तातडीने पथके वाढवून बिबट्याच्या हालचालींचा माग काढावा आणि आवश्यक त्या सुरक्षित उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या दिसल्यास गर्दी करू नये, पाठलाग टाळावा आणि तात्काळ देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधावा. जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावीत, रात्री एकट्याने बाहेर पडू नये तसेच शेतात जाताना शक्यतो समूहाने जावे, असेही सांगण्यात आले आहे.
मात्र, चिंचखेड परिसरातील दहशत केवळ आवाहनांनी थांबणार नाही. वन विभागाने तातडीने ठोस कारवाई करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, हीच आता परिसराची एकमुखी मागणी आहे













Total Users : 3464906