spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन; सजवलेल्या बैलगाडीचे सारथ्य करत रविकांत तुपकरांनी गणरायाला घातले साकडे—“दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत द्या, बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या; सरकार आणि नेत्यांना शेतकऱ्यांसाठी काम करण्याची सद्बुद्धी द्या!”

बुलढाणा (हॅलो बुलढाणा)  दफड्याचा ताल, सजवलेली बैलगाडी आणि त्याचे सारथ्य करणारे रविकांत तुपकर… अशा पारंपरिक आणि लक्षवेधी वातावरणात बुलढाणा शहरात शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे दणक्यात आगमन झाले. श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चिखली रोडवरील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटरसमोर यंदाही मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी राजा’च्या प्रतिष्ठापनेचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने गणरायाची मूर्ती सजवलेल्या बैलगाडीतून आणण्यात आली. विशेष म्हणजे, या बैलगाडीचे सारथ्य स्वतः रविकांत तुपकर यांनी केले. डफड्याच्या तालावर आणि गणरायाच्या जयघोषात ही मिरवणूक क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटरसमोर पोहोचली.गणरायाचे आगमन झाल्यानंतर विधिवत पूजा व प्रतिष्ठापना करण्यात आली. रविकांत तुपकर आणि ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यंदा महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाला सामोरा जात आहे. पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर तुपकरांनी ‘क्रांतिकारी राजा’समोर शेतकऱ्यांसाठी साकडे घातले. ‘संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी, दुष्काळसदृश्य जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्यासह इतर पात्र जिल्ह्यांचा समावेश व्हावा आणि सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना समजण्याची सद्बुद्धी मिळावी,’ अशी प्रार्थना तुपकरांनी केली.

‘सत्ताधारी नेत्यांनी व्यक्तिगत स्वार्थ आणि आपापसातील भांडणांमध्ये वेळ न घालवता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढण्याचे बळ दाखवावे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची सद्बुद्धी त्यांना मिळावी,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘क्रांतिकारी राजा’समोर आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी आणि देखावा पाहण्यासाठी नागरिकांचीही उत्सुकता पाहायला मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!