जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष… विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने जळगाव जामोद शहरासह संपूर्ण तालुका भक्तिरसात न्हाऊन निघाला! सोमवार, १४ सप्टेंबर रोजी घरोघरी मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या आगमनाचा आनंद ओसंडून वाहत होता.
जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ५५ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. यामध्ये शहरातील १५, तर ग्रामीण भागातील ४० मंडळांचा समावेश आहे. सार्वजनिक मंडळांनी आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई, धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक बांधिलकी जपणारे आणि जनजागृतीपर विविध उपक्रम आयोजित करण्याची तयारी केली आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी पोलीस प्रशासनानेही सुरक्षेचा कडक बंदोबस्त उभारला आहे. गणेशोत्सव काळात ६ अधिकारी, ४० पोलीस कर्मचारी, ५५ होमगार्ड, एसआरपीएफची २ पथके, २ पीएसआय, २ सीआरओ, अकोल्यातील १० प्रशिक्षणार्थी कर्मचारी आणि ५ महिला प्रशिक्षणार्थी तैनात राहणार आहेत. शहरासह तालुक्यातील संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, आक्षेपार्ह अथवा संशयास्पद मजकूर पुढे पाठवू नका आणि त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विसर्जन मिरवणुकीतही कडेकोट सुरक्षा राहणार असून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे













Total Users : 3457363