बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच उच्चशिक्षित प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. एका शिक्षक संघटनेसह समर्थक शिक्षकांच्या आग्रहाला मान देत त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने प्रस्थापित उमेदवारांची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.
वेतन, सेवाशर्ती, पदोन्नती, अनुदान, जुनी पेन्शन योजना, शैक्षणिक धोरणे आणि प्रशासकीय अडचणींमध्ये शिक्षक वर्षानुवर्षे अडकले आहेत. हे प्रश्न शासनदरबारी आक्रमकपणे मांडण्यासाठी अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वाची गरज असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे पोहरे यांच्या संभाव्य उमेदवारीकडे शिक्षकांच्या नव्या आवाजाच्या रूपाने पाहिले जात आहे.
प्रा. अदिती पोहरे या माजी कृषिमंत्री हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत. राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या पोहरे यांची उच्चशिक्षित पार्श्वभूमी ही त्यांची मोठी जमेची बाजू ठरणार आहे. त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. स्ट्रक्चरल डिझाईन, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. मानसशास्त्र पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली आहे.
त्या २०१० पासून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला येथे पदव्युत्तर स्तरावर भूकंप अभियांत्रिकी विषयाच्या विशेष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विविध संशोधन प्रकल्प आणि शोधप्रबंधांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ‘देशोन्नती’च्या संचालक तसेच महिलांचे व्यासपीठ ‘मनस्विनी’च्या संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्या सक्रिय आहेत.
उच्चशिक्षण, अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, सामाजिक सक्रियता आणि राजकीय वारसा अशी चौफेर ताकद घेऊन पोहरे मैदानात उतरल्यास शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार, एवढे मात्र निश्चित!













Total Users : 3457381