जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) जळगाव जामोद शहरात एका अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून तिच्याशी कथित अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने जवळपास दोन महिने तिचा छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी जमील खान, रा. जळगाव जामोद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमाच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, आरोपीने दुचाकीवरून पीडित मुलीचा पाठलाग केला. “माझ्याशी बोलत जा, अन्यथा तुझ्या भाऊ-बहिणीला खल्लास करीन,” अशी धमकीही त्याने दिल्याचा आरोप आहे. आरोपीने मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क व व्हिडीओ कॉल करून आक्षेपार्ह मागण्या केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
इतकेच नव्हे, तर पीडितेला घरी भेटण्यासाठी बोलावून तिच्याशी जबरदस्तीने अश्लील स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत कोणाला सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद आहे. १० सप्टेंबर रोजी पुन्हा पीडितेला एकांतात अडवून गैरवर्तन केल्यानंतर तिने घरी येऊन आपल्यावरील कथित अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली.
कुटुंबीयांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी अपराध क्रमांक ५७७/२०२६ दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत













Total Users : 3454442