spot_img
spot_img

पावसाने पाठ फिरवली, पिकांनी टाकली मान! सावत्रा-सोनारगव्हानमध्ये खरीप उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; ‘तातडीने पंचनामे करा!’

मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील सावत्रा आणि सोनारगव्हान शिवारात पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने खरीप पिके अक्षरशः वाळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने हवालदिल शेतकऱ्यांनी आता प्रशासनाचे दार ठोठावले आहे. वाळत असलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा करावा, अशी आक्रमक मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली.

वैभव विजयराव पाटील-निकस यांच्यासह सावत्रा येथील शेतकऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी मेहकर तहसील कार्यालयात निवेदन सादर केले. यंदा मान्सूनचा पाऊस अत्यल्प झाला असून मागील एक महिन्यापासून पावसाचा थेंबही न पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिकांनी माना टाकल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. महागडे बियाणे, खते आणि औषधांवर हजारो रुपये खर्च करूनही आता उत्पादनाची आशा धूसर झाली आहे.

प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवू नयेत; प्रत्यक्ष बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही देण्यात आली. निवेदनावर योगेश आखोले, गणेश निकस, प्रदीप निकस, गजानन निकस यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!