spot_img
spot_img

EXCLUSIVE ‘कुणी रस्ता देता का रस्ता?’ चाळीस टपरीची आर्त हाक; पण मुक्या-बहिऱ्या प्रशासनाला ऐकू येणार कधी? स्वातंत्र्याची ८० वर्षे उलटली, तरी नशिबी पहाडी पायवाटच! उपचाराअभावी ५ ते ६ जणांचा बळी; अत्यवस्थ रुग्णांना बांबूच्या झोळीतून न्यावे लागते रुग्णालयात!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव झाला, विकासाच्या घोषणा झाल्या; मात्र आदिवासीबहुल चाळीस टपरी परिसरातील गोमाल गाव आजही रस्त्यासाठी अक्षरशः टाहो फोडत आहे. अत्यवस्थ रुग्णाला बांबू आणि चादरीच्या झोळीतून पहाडी पायवाटेने न्यावे लागत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने आतापर्यंत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. तरीही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची झोप उडालेली नाही

 

रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचत नाही, मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात आणि ग्रामस्थांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. गोमाल येथील शेवलीबाई दितला सोलंकी यांच्या उपचारासाठी नातेवाइकांना रात्री अनेकदा पायी चकरा माराव्या लागल्या. अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. यापूर्वी गावातील तीन बालकांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तसेच सर्पदंश झालेल्या गर्भवती सादुरी राधेश्याम खरात यांनाही रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भिंगारा ते गोमाल या ५.२५ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल ७ कोटी ७५ लाख ८४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर आहे. पुढील दहा वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणखी ३४ लाख १२ हजार रुपयांची तरतूद आहे. फलकानुसार काम ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू होऊन १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. उद्घाटन आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पत्नी सौ. अपर्णा कुटे यांच्या हस्ते झाले; मात्र मुदत तोंडावर असतानाही प्रत्यक्षात हालचाल शून्य असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहणार? फलकावरील रस्ता प्रत्यक्षात जमिनीवर कधी उतरणार?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!