जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) सातपुड्याच्या कुशीत राहून सामान्य नागरिक, शेतकरी आणि वंचितांच्या प्रश्नांना आपल्या निर्भीड लेखणीतून धार देणारे ‘सकाळ’चे ज्येष्ठ तालुका प्रतिनिधी गुलाबराव नामदेव इंगळे यांचे रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बुलढाणा जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक स्पष्टवक्ता, अभ्यासू आणि लढवय्या आवाज कायमचा शांत झाला आहे.
बारावीनंतर डीएमएलटीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही काळ वैद्यकीय क्षेत्रात सेवा दिली. त्यानंतर तत्कालीन आमदार कृष्णराव इंगळे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून तब्बल १५ वर्षे काम करताना त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या जवळून अनुभवल्या. पुढे पत्रकारितेत प्रवेश करून ‘सकाळ’चे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी सातपुडा परिसरातील असंख्य ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली.
सत्तेचा दबाव असो की व्यवस्थेची नाराजी गुलाबराव इंगळे यांची लेखणी कधीही डगमगली नाही! शेतकरी, कष्टकरी आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेला शस्त्र बनवले. जिल्हा पत्रकार संघ आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठीही ते खंबीरपणे उभे राहिले. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून पत्रकारांना संघटित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
दहा महिन्यांपूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती खालावल्याने दहा दिवसांपूर्वी त्यांना अकोला येथील ‘आयकॉन’ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात आई शेवंताबाई, पत्नी डॉ. प्रा. कल्पना इंगळे, मुलगा निशांत आणि मुलगी डॉ. कल्याणी असा परिवार आहे.
गुलाबराव गेले… पण निर्भीड लेखणीचा दरवळ, प्रेमळ स्वभावाची ऊब आणि माणुसकीचा सुगंध सातपुड्याच्या मातीत कायम राहणार आहे! ‘हॅलो बुलढाणा’ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!











Total Users : 3408089