जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ४५ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या २२ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस ठाण्यासाठी एकूण ३२ पदे मंजूर असताना तब्बल १० पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला असून, एवढ्या मोठ्या परिसराची सुरक्षा केवळ २२ कर्मचाऱ्यांच्या बळावर कशी सांभाळायची, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
जानेफळ पोलीस ठाण्याची हद्द सुमारे ३० ते ४० किलोमीटर परिसरात पसरलेली आहे. या विस्तीर्ण हद्दीतील ४५ गावांमध्ये गस्त घालणे, गुन्हे रोखणे, दाखल प्रकरणांचा तपास करणे, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही सर्व जबाबदारी उपलब्ध मनुष्यबळालाच पार पाडावी लागत आहे.
आधीच कर्मचारी अपुरे असताना समृद्धी महामार्गावरील विशेष ड्युटीसाठीही जानेफळ पोलिसांची नियुक्ती केली जात आहे. त्याशिवाय व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, सण-उत्सव आणि दैनंदिन गुन्हेगारीचा तपास या जबाबदाऱ्यांमुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी मानसिक आणि शारीरिक तणावाखाली काम करत आहेत. महामार्गावरील ड्युटी लागल्यानंतर पोलीस ठाण्याच्या नियमित कामासाठी उपलब्ध मनुष्यबळ आणखी कमी होते.
४५ गावांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. मंजूर असलेली रिक्त १० पदे त्वरित भरून जानेफळ पोलीस ठाण्याला अतिरिक्त मनुष्यबळ द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे











Total Users : 3403676