मलकापूर (हॅलो बुलढाणा/ करन झनके) धरणगाव ग्रामपंचायतीमधील विकासकामांच्या हिशेबाचा मुद्दा शुक्रवारी चांगलाच पेटला! रस्ते, नाल्या, पेव्हर ब्लॉक आणि पाणीपुरवठा योजनेसह विविध कामांचे स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक ऑडिट करा आणि तातडीने ग्रामसभा घ्या, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या दिला. अखेर प्रोसिडिंग बुक ठेवलेले कपाट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील करण्यात आल्याने ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“ग्रामसभा घेतल्याशिवाय कार्यालयातून हलणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामसेवक कार्यालयात दाखल झाले. ग्रामस्थांनी ग्रामसभेचे प्रोसिडिंग बुक मागितले असता ते कपाटात असून चावी सरपंचांकडे असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.
त्यामुळे “कपाट उघडा, अन्यथा सील करा,” अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित कपाट सील करण्यात आल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
ग्रामस्थांनी विकासकामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता, ठराव, अंदाजपत्रके, कार्यादेश, निविदा, मोजमाप पुस्तिका, बिल-वाउचर, पूर्णत्व व उपयोगिता प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. केवळ कागदी चौकशी न करता प्रत्यक्ष कामांची पाहणी करून मंजूर निधी आणि झालेल्या कामाची पडताळणी करावी, अशीही मागणी आहे.
अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून रक्कम वसूल करावी, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. ३० दिवसांत चौकशी सुरू न झाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना विलास पाटील, रमेश झनके, करण झनके, सुरेश पाटील आणि राहुल कवळे उपस्थित होते. आता सीलबंद कपाटातून नेमकी कोणती कागदपत्रे समोर येतात आणि प्रशासन काय कारवाई करते, याकडे धरणगावकरांचे लक्ष लागले आहे!












Total Users : 3397250