spot_img
spot_img

‘१० सप्टेंबरपर्यंत अटक करा; अन्यथा पुन्हा एल्गार!’ तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व महसूल पथकावरील जीवघेण्या हल्ल्याचे प्रकरण; प्रशासनाच्या आश्वासनानंतर ‘काम बंद’ आंदोलन तात्पुरते स्थगित, आजपासून कामकाज पूर्ववत!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि महसूल पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने संतप्त महसूल संघटनांनी सुरू केलेले ‘काम बंद’ आंदोलन १० सप्टेंबरपर्यंत स्थगित केले आहे. आरोपीला दिलेल्या मुदतीत अटकझाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा संघटनांनी दिला आहे.

१९ ऑगस्ट रोजी अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतूक रोखताना तहसीलदार डोंगरजाळ, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, वाहनचालक संतोष भोपळे व शिपाई पंजाबराव ताटे यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात एकलारा येथील हर्षल अंभोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र मुख्य आरोपीला अटक न झाल्याने विविध महसूल संघटनांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करून २४ ऑगस्टपासून काम बंद केले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच महसूल व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मुख्य आरोपीला १० सप्टेंबरपर्यंत अटक करण्याचे आश्वासन पोलीस विभागाने दिल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांची गैरसोय लक्षात घेत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. सर्व महसूल कर्मचारी २ सप्टेंबरपासून नियमित कामकाज सुरू करणार आहेत.

दरम्यान, “महसूल पथकावर हल्ला करून आरोपी मोकाट राहणार असेल, तर अधिकारी निर्भयपणे कारवाई कशी करणार?”असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधातील कारवाईदरम्यान कर्मचाऱ्यांना ठोस सुरक्षा द्यावी आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!