spot_img
spot_img

EXCLUSIVE आता इशारा नाही… कारवाईची तारीख ठरली!चिखली-बुलढाणा-मलकापूर महामार्गावरील अतिक्रमणांवर उद्यापासून हातोडा! ‘हॅलो बुलढाणा’ने आधीच दिले होते संकेत; २ ते ७ सप्टेंबरदरम्यान मोहीम! स्वतः अतिक्रमण काढा, अन्यथा कारवाईचा खर्चही तुमच्याच खिशातून!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महामार्गालगत बेकायदेशीर अतिक्रमण करून बसलेल्यांसाठी आता कारवाईची तारीख समोर आली आहे! मलकापूर-बुलढाणा-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-ए वरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, उद्या, २ सप्टेंबरपासून ७ सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आता प्रत्यक्ष कारवाईच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संबंधित सूचनेत नमूद आहे. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत; अन्यथा प्रशासनामार्फत ती हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. एवढेच नव्हे, तर कारवाईत काढलेले साहित्यही जमा करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

‘हॅलो बुलढाणा’चा सावधगिरीचा इशारा आठवतोय ना?

या महामार्गालगत प्लॉट, घरे अथवा व्यावसायिक जागा खरेदी करताना कागदपत्रे आणि परवानग्यांची योग्य माहिती घेण्याचे आवाहन ‘हॅलो बुलढाणा’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून केले होते. रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यताही मांडली होती. आता अतिक्रमण हटविण्याचे निश्चित वेळापत्रक समोर आल्याने त्या वृत्तातील सावधगिरीच्या इशाऱ्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

 

कुठे, कधी होणार कारवाई?

▪️ २ व ३ सप्टेंबर : हॉटेल माऊली, मलकापूर रोड, बुलढाणा ते येळगाव.

▪️ ४ सप्टेंबर : जयस्तंभ चौक ते धाड नाका.

▪️ ५ सप्टेंबर : येळगाव ते चिखली.

▪️ ६ सप्टेंबर : हॉटेल माऊली, बुलढाणा ते मोताळा.

▪️ ७ सप्टेंबर : मोताळा ते मलकापूर.

या वेळापत्रकानुसार महामार्गाच्या वेगवेगळ्या भागांत सलग सहा दिवस कार्यवाही नियोजित आहे. संबंधित भागांतील अतिक्रमणधारकांना स्वतः अतिक्रमण हटविण्याची सूचना देण्यात आली असून, तसे न केल्यास प्रशासनाची कारवाई आणि तिच्या खर्चाची वसुली, अशा दोन्ही बाबींना सामोरे जावे लागणार आहे.
महामार्गालगत असलेले प्रत्येक घर, दुकान किंवा ढाबा कारवाईत येणार, असा सरसकट अर्थ या सूचनेतून निघत नाही. जाहीर केलेली मोहीम बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात आहे. त्यामुळे आपल्या जागेची हद्द, बांधकामाची परवानगी आणि संबंधित कागदपत्रांची खातरजमा करणे गरजेचे ठरणार आहे.

अतिक्रमणही जाणार; हटविण्याचे बिलही येणार!

सूचनेतील सर्वांत ठळक बाब म्हणजे अतिक्रमण काढण्याचा खर्च संबंधितांवरच टाकला जाणार आहे. स्वतःहून अतिक्रमण न हटविणाऱ्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार असल्याने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

आता तारीख ठरली, मार्ग निश्चित झाले आणि खर्चवसुलीचाही इशारा मिळाला! त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या मोहिमेची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होते, कोणत्या ठिकाणी अतिक्रमणे हटविली जातात आणि संपूर्ण कार्यवाही नियोजित वेळेत पूर्ण होते का, याकडे लक्ष लागणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!