बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील अनधिकृत बॅनरच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांभोवती निर्माण झालेले राजकीय चर्चेचे वादळ आता नव्या वळणावर पोहोचले आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा रंगत असतानाच, संबंधित व्यक्ती नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी असल्याची अधिकृत कागदपत्रे पुढे आली आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी टीम ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना ही कागदपत्रे समोर ठेवली.
नगर परिषद बुलढाणाच्या अतिक्रमण विभागप्रमुखांनी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात ‘राजधानी सप्लायर्स’मार्फत अतिक्रमण विभागासाठी पुरविण्यात आलेल्या आठ कर्मचाऱ्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. यामध्ये विक्की आवाड, रवी गणेश आवाड, महेंद्र संतोष चव्हाण आणि सचिन बाबुराव शेळार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अतिक्रमणाची पाहणी, नियंत्रण व निर्मूलनासह अनधिकृत होर्डिंग, बॅनर, झेंडे हटविणे आणि रस्त्यावरील लोडिंगविरोधात कारवाई करण्यासाठी हे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आल्याचे पत्रातून स्पष्ट होते. हे कर्मचारी नगर परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार काम करीत असल्याचाही उल्लेख आहे.
दरम्यान, राजधानी सप्लायर्सने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या स्वतंत्र पत्रात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अतिक्रमण विभागाला दहा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे एका पत्रात आठ, तर दुसऱ्या पत्रात दहा कर्मचाऱ्यांचा उल्लेख नेमका का, हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
माध्यमांमध्ये या कर्मचाऱ्यांची ओळख आमदार गायकवाड यांचे ‘समर्थक’ म्हणून पुढे आली होती; मात्र अधिकृत पत्रांनुसार ते कंत्राटी मनुष्यबळ असल्याचा दावा समोर आला आहे. आता प्रश्न एवढाच बॅनर हटविण्याची कारवाई कर्मचाऱ्यांनी स्वतःहून केली की पालिका प्रशासनाच्या आदेशाने? याचे स्पष्ट उत्तर नगरपालिका प्रशासनालाच द्यावे लागणार आहे!













Total Users : 3375213