spot_img
spot_img

महसूल यंत्रणेवर हल्ला; तरी आरोपींना अभय कोणाचे? उद्यापासून सिंदखेडराजा तहसीलला ‘कुलूप’! अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बेमुदत रजेचा एल्गार!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील अवैध गौणखनिज वाहतूक प्रतिबंधक पथकावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला आहे. प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा न निघाल्याने सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्या, १ सप्टेंबर २०२६ पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अजित दिवटे यांना सादर करण्यात आले.

देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी २४ ऑगस्टपासून सामूहिक रजेवर आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देत सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांनीही २७ ऑगस्ट रोजी सामूहिक रजेचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार २९ ऑगस्ट रोजी आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करून महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण द्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

निवेदनावर महसूल उपविभागीय अध्यक्ष विवेक जगताप, नायब तहसीलदार डॉ. प्रविण वराडे, एस. डी. बंगाळे, एस. आर. फाले, एस. बी. रोकडे, आर. एस. सौर यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या आंदोलनामुळे दाखले, फेरफार, महसुली प्रकरणे आणि नागरिकांशी संबंधित प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. हल्लेखोरांवर कारवाई होणार की सर्वसामान्यांना प्रशासनाच्या दिरंगाईची किंमत मोजावी लागणार? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!