spot_img
spot_img

मतदारांनो, ‘नाव असेलच’ या भ्रमात राहू नका! यादीतून नाव गायब असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी ठोका दावा; उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांचा ‘फायनल अलर्ट’!

सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) तुमच्या खिशात मतदार ओळखपत्र आहे म्हणून यादीत नाव असेलच, या भ्रमात राहू नका! विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये नाव गायब असल्यास किंवा तपशीलात चुका आढळल्यास ३० सप्टेंबरपर्यंत दावा अथवा हरकत दाखल करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे.

मतदारांनी एसआयआर पोर्टल, भारत निवडणूक आयोगाचे मतदार सेवा पोर्टल, संबंधित मतदान केंद्र किंवा बीएलओकडील प्रारूप यादीमध्ये स्वतःसह संपूर्ण कुटुंबाची नावे तपासावीत. फक्त नाव दिसले म्हणजे काम संपले असे समजू नका! नावाचे स्पेलिंग, वडिलांचे किंवा पतीचे नाव, जन्मतारीख, वय, लिंग, पत्ता, छायाचित्र, ईपीआयसी क्रमांक आणि मतदान केंद्रही अचूक असल्याची खात्री करा.

यादीत नावच नसल्यास नवीन नोंदणी किंवा वगळलेले पात्र नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह Form 6 दाखल करावा. नाव, पत्ता, वय, छायाचित्र किंवा इतर तपशील चुकीचा असल्यास Form 8 द्वारे दुरुस्ती करता येणार आहे.

२०२५ च्या मतदार यादीत नाव होते; पण २०२६ च्या प्रारूप यादीत गायब आहे? मग महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या एसआयआर पोर्टलवरील ASDD तपासणी सुविधेतून नाव वगळण्याचे कारण शोधा.

दावे-हरकतींवर सुनावणी आणि निर्णयाची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदानाच्या दिवशी यंत्रणेला दोष देण्यापूर्वी आजच यादीत नाव शोधा! शेवटच्या तारखेची वाट न पाहता ३० सप्टेंबरपूर्वी Form 6 किंवा Form 8 दाखल करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!