spot_img
spot_img

BREAKING! जयस्तंभ चौकात मध्यरात्री पोस्टरवरून ‘राडा’! विद्याधर महालेंच्या समर्थकांना अश्लील शिवीगाळ अन् जिवे मारण्याची धमकी; विक्की आव्हाडसह ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा! ही कोणती दादागिरी?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच जयस्तंभ चौकात शुभेच्छांचे पोस्टर लावण्यावरून मध्यरात्री जोरदार वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबतच्या सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, विद्याधर महाले मित्रमंडळाचे सदस्य मंदार बाहेकर हे प्रमोद गावंडे, मुन्नाभाऊ बँडवाल, कौस्तुभ पाटील आणि मजुरांसह ३० ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता जयस्तंभ चौकातील गांधी भवनासमोर पोस्टर लावत होते. नगर परिषदेची परवानगी घेऊन हे काम सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

याचवेळी एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायरमधून तीन ते चार जण उतरले. दुसऱ्या बाजूने विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबत आणखी तीन ते चार अनोळखी व्यक्ती तेथे आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. “तुम्ही पोस्टर कसे लावता?” असा जाब विचारत त्यांनी अश्लील शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि कार्यकर्ते व मजुरांना पोस्टर लावण्यापासून रोखल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ८३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९, २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन वाघमोडे करीत आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागात, परवानगी घेऊन पोस्टर लावणाऱ्यांना धमकावण्याचा आरोप गंभीर आहे. राजकीय मतभेद असतील, स्पर्धा असेल; पण पोस्टर कोणाचे लावायचे आणि कोणाचे नाही, हे धमकीच्या जोरावर ठरवले जाणार का? विद्याधर महालेंचे नाव पाहून एवढा संताप कशासाठी आणि ही नेमकी कोणती दादागिरी?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!