देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) शिक्षकपद म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर भावी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी! हीच जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी देऊळगाव मही शहरातील पाच गुणवंतांनी एकाच वेळी शिक्षक भरतीत दमदार यश मिळवत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच झालेल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेत या पाच ‘फाईव्ह स्टार’ उमेदवारांची महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये शिक्षकपदी निवड झाली आहे.
दीपक शिंगणे, अप्पाराव खेडेकर, विठ्ठल शिंगणे, कु. अश्विनी अवसरमोल आणि सौ. प्रियंका शिंगणे अशी या नवनियुक्त शिक्षकांची नावे आहेत. प्रतिकूल परिस्थिती, कठोर परिश्रम आणि स्पर्धेचे तगडे आव्हान यांच्याशी दोन हात करत या गुणवंतांनी आपल्या जिद्दीच्या बळावर यशाचे शिखर गाठले. त्यांच्या या पंचतारांकित कामगिरीमुळे संपूर्ण देऊळगाव मही शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पवित्र रक्षाबंधनाच्या औचित्यावर शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी देऊळगाव मही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पाचही नवनियुक्त शिक्षकांचा पेढे भरवून तसेच शाल व श्रीफळ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते गणेशदादा शिंगणे, भाजपा युवा नेते गणेश नागरे, शिवसेना शहरप्रमुख तुळशीराम पंडित, भाजपाचे श्रीकिसन शिंगणे, केतन कुलकर्णी, माजी सैनिक रवींद्र शिंगणे, राजेंद्र शिंगणे, शिवसेना युवा नेते रवींद्र इंगळे, सचिन शिंगणे, ज्ञानेश्वर वाघ, अर्चना अवसरमोल, कैलास राऊत, प्रदीप अवसरमोल आणि ऋषिकेश शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देऊळगाव महीच्या या ‘फाईव्ह स्टार’ने सिद्ध केले की, ध्येय पक्के असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर कोणतीही परिस्थिती यशाचा मार्ग रोखू शकत नाही!











Total Users : 3359120