spot_img
spot_img

अभिमानास्पद! मेहकरच्या मातीतला ‘सागर’ मलेशियात उसळणार! महाराष्ट्रातील पहिला भारतीय लॅक्रॉस कर्णधार बुलढाण्यातून विजयाच्या मोहिमेवर रवाना; आता तिरंगा फडकवण्याचा निर्धार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी, अशी अभिमानास्पद कामगिरी सागर नंदकिशोर बोर्डे यांनी केली आहे. मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लॅक्रॉस स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधार म्हणून निवड झालेले सागर बोर्डे बुलढाण्यातून मलेशियाच्या दिशेने रवाना झाले. विशेष म्हणजे, भारतीय लॅक्रॉस संघाचे कर्णधारपद मिळविणारे ते महाराष्ट्रातील पहिले खेळाडू ठरले आहेत.

मेहकरच्या मातीतून क्रीडा प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सागर यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या बळावर थेट आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंत झेप घेतली. यापूर्वी सौदी अरेबियातील रियाध येथे भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत दोन रौप्यपदके, तर राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळवून त्यांनी आपल्या गुणवत्तेची दमदार छाप सोडली आहे.

आता मलेशियाच्या मैदानावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी सागर यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या निवडीने बुलढाण्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“मलेशियात भारताचा तिरंगा अभिमानाने उंच फडकवण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणार!” असा विजयी निर्धार कर्णधार सागर बोर्डे यांनी व्यक्त केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!