सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख)
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वाला मलकापूर पांग्रा येथे मानवसेवेची अनोखी जोड देण्यात आली. सरकार सैलानी ग्रुपच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करीत ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असल्याचा प्रभावी संदेश दिला.
हजरत फकीर शाह बाबा (र.ह.) यांच्या दर्ग्यासमोर बुधवार, २६ ऑगस्ट रोजी हे शिबिर पार पडले. रक्तसंकलनासाठी जालना ब्लड सेंटर अँड कंपोनंट अॅफेरेसिस सेंटरच्या वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले होते. शिबिराला परिसरातील नागरिकांसह युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रक्तदानापूर्वी वैद्यकीय पथकाने प्रत्येक रक्तदात्याचे वय, रक्तदाब, हिमोग्लोबिन आणि आरोग्यविषयक माहिती तपासली. पात्र रक्तदात्यांकडून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व, नियमित रक्तदानाचे आरोग्यदायी फायदे आणि समाजात पसरलेले गैरसमज याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. युवकांचा लक्षणीय सहभाग या शिबिराचे खास आकर्षण ठरला.
दरम्यान, सरकार सैलानी ग्रुपच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. धार्मिक उत्सवासोबत रक्तदानासारखा जीवनदायी उपक्रम राबवून आयोजकांनी सर्वधर्मीय ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश दिला.
यावेळी संत साबीर बावा साहब, समाजसेवक शंकरराव उगलमुगले, बीट जमादार निवृत्ती पोफळे आणि ग्रामविकास अधिकारी परमेश्वर दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती वाढावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











Total Users : 3349493