spot_img
spot_img

BIG SHOCKING! अर्धे बाळ पोटात, अर्धे बाहेर… तरी सरकारी मदतीचे दरवाजे बंद! केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मेहकरमध्ये रुग्णालयापासून ५० मीटरवर महिलेची रस्त्यावरच प्रसूती; डॉक्टर गायब, नर्सनेही येण्यास नकार दिल्याचा आरोप!

मेहकर (हॅलो बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर शहरातच सरकारी आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी संतापजनक घटना समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर प्रसूतीच्या वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेचीची चक्क रस्त्यालगतच्या ओट्यावर प्रसूती झाली. धक्कादायक म्हणजे, परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगूनही रुग्णालयातील स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांच्या शेजारी राहणाऱ्या पिसे परिवारातील महिलेला सकाळी सहाच्या सुमारास अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. घरी मदतीसाठी कोणी नसल्याने ती चालत ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली; मात्र रुग्णालयापूर्वीच एका ओट्यावर कोसळली. त्या वेळी बाळाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत अडकलेला असल्याने तिच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.

हा प्रकार पाहताच सौभागे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन स्टाफ नर्सकडे मदतीची विनंती केली. मात्र, “रुग्णालयात डॉक्टर नाहीत, मी एकटीच आहे; बाहेर येऊ शकत नाही,” असे उत्तर देत नर्सने मदतीस नकार दिल्याचा दावा सौभागे यांनी केला. परिस्थितीचे गांभीर्य वारंवार सांगूनही मदत मिळाली नसल्याचा आरोप आहे.

अखेर सौभागे यांनी एका खासगी रुग्णालयातील नर्सला बोलावले. सौभागे परिवारातील महिलांच्या सहकार्याने रस्त्यावरच प्रसूती करण्यात आली. त्यानंतर माता आणि बाळाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

नाईट ड्युटीवरील डॉक्टर नेमके कुठे होते? आपत्कालीन प्रसंगीही सरकारी यंत्रणा धावणार नसेल तर या रुग्णालयाचा उपयोग काय? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या होमटाऊनमध्येच आरोग्यसेवेची ही अवस्था असेल, तर ग्रामीण भागातील परिस्थिती किती भयावह असेल? या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित रुग्णालय प्रशासनाची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!