spot_img
spot_img

EXCLUSIVE बुलढाण्याच्या तरुणांशी पंतप्रधान मोदी बोलणार? २७ ऑगस्टला ‘खेलो इंडिया संवाद’; २०३६च्या ऑलिम्पिकपासून विकसित भारतापर्यंत युवकांचा आवाज घुमणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील तरुणाईला राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळणार आहे. ‘खेलो इंडिया संवाद’ आणि ‘विकसित भारत युवा कनेक्ट

Youth Connect Sports Edition’ या विशेष उपक्रमाचे आयोजन २७ ऑगस्ट २०२६ रोजी राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा आणि श्री शिवाजी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, मोताळा येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांशी आभासी माध्यमातून संवाद साधणार आहेत.

मेरा युवा भारत (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा युवा अधिकारी दिक्षा पोमण आणि NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित पी. साळकुटे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसीचे NSS स्वयंसेवक उपस्थित होते.

देशभरातील तब्बल १,६०० ठिकाणांवरील आठ लाखांपेक्षा अधिक युवक पंतप्रधानांच्या संवादाशी जोडले जाणार आहेत. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील युवकांचाही दमदार सहभाग राहणार आहे. दोन्ही महाविद्यालयांत सकाळी १० वाजेपर्यंत मान्यवर, खेळाडू आणि युवक उपस्थित राहतील.

पंतप्रधानांच्या संबोधनानंतर स्थानिक खेळाडू, मेरा युवा भारतचे स्वयंसेवक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद रंगणार आहे. मागील १२ वर्षांत देशातील क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा परिसंस्थेत झालेल्या परिवर्तनावर चर्चा केली जाईल.

तळागाळातील क्रीडा सुविधा मजबूत करणे, २०३६च्या ऑलिम्पिकसाठी प्रतिभावान खेळाडू घडविणे, शासनात युवा नेतृत्वाचा सहभाग वाढविणे आणि विकसित भारतासाठी युवकांचे सक्षमीकरण या चार प्रमुख विषयांवर तरुणाईची मते जाणून घेतली जाणार आहेत. युवकांच्या सूचना QR कोडद्वारे संकलित केल्या जातील, तर त्यांना VBYLD Quiz मध्येही सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी दिक्षा पोमण आणि प्राचार्य डॉ. शिरीष जैन यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!