spot_img
spot_img

भक्तीला स्वच्छतेची जोड! देवानंद पवार फाउंडेशनच्या पुढाकारातून पालखी मार्ग व सप्तऋषी मंदिर परिसरात राबविली स्वच्छता मोहीम! १०० हून अधिक वारकऱ्यांसह माधुरी पवारांनी पालखी मार्ग केला चकाचक!

मेहकर (अविनाश लाड/हॅलो बुलढाणा) भक्तीला सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छता मोहीमेची जोड देत देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. भक्ती ही केवळ देवदर्शनापुरती मर्यादित नसून परिसराची स्वच्छता करून समाजाप्रतीची जबाबदारी पार पाडण्यातही खरी भक्ती आहे, या भावनेतून फाउंडेशनचे संस्थापक देवानंद पवार आणि त्यांच्या कन्या ॲड.माधुरी देवानंद पवार यांच्या पुढाकारातून पालखी मार्ग तसेच पंचक्रोशीतील सप्तऋषी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती प्राप्त श्री शेगावीचा राणा श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने १९ ऑगस्ट रोजी खामगाव ते शेगाव या सुमारे २५ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यात देवानंद पवार यांच्या नेतृत्वात फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी आणि १०० हून अधिक वारकऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासात श्रीसंत गजानन महाराजांची पालखी या मार्गाने मार्गस्थ होत असतांना लाखो भाविकांचा सहभाग असतो. मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने मार्गावर निर्माण होणारा कचरा लक्षात घेता पालखीचा मार्ग स्वच्छ ठेवण्याचा संकल्प देवानंद पवार फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला.
स्वतः देवानंद पवारांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत रस्त्यावरील कचरा गोळा केला.त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आणि वारकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत पालखी मार्ग स्वच्छ केला.

▪️सप्तऋषी मंदिर परिसरातही स्वच्छता!

सेवाभावाचा विस्तार करत ॲड. माधुरी देवानंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील सप्तऋषी मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने २५ महिला वारकऱ्यांना सोबत घेत देळप आणि गोमेधर येथील सप्तऋषी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. विशेषतः श्रावण महिन्यात भगवान महादेवाची भक्ती करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे या धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे प्राथमिक कर्तव्य आहे,अशी भावना माधुरी ताईंनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!