चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) रेशन दुकानातून मिळालेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या तांदळामुळे संतापलेल्या एका नागरिकाने थेट चिखली तहसील कार्यालय गाठत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. तहसीलदारांच्या कॅबिनसमोरच तांदूळ फेकून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आवाज उठविण्यात आल्याने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.
स्थानिक स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरायुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप संबंधित नागरिकाने केला. वारंवार निकृष्ट धान्य मिळत असल्याने संतापाचा उद्रेक झाला आणि नागरिकाने तांदळाचे नमुने घेऊन तहसील कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडत त्याने कॅबिनसमोरच तांदूळ फेकून प्रशासनाचा निषेध केला.
“जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते शासन माणसांना खाण्यासाठी देत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकाने उपस्थित केला. या प्रकारामुळे गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी असलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लाभार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
घटनेनंतर पुरवठा विभागाने तक्रारीची दखल घेतल्याचे सांगितले. चिखलीच्या पुरवठा निरीक्षक प्रियंका सोनूकुसळे म्हणाल्या, “संबंधित व्यक्तीची तक्रार गांभीर्याने घेण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल. नागरिकांना यापुढे चांगल्या दर्जाचे धान्य मिळावे आणि पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी योग्य प्रयत्न केले जातील.”
आता प्रशासन केवळ आश्वासनांची खैरात वाटणार की तांदळाच्या दर्जाची तपासणी करून संबंधितांवर ठोस कारवाई करणार? निकृष्ट धान्याचा पुरवठा नेमका कुठून आणि कोणाच्या दुर्लक्षामुळे झाला, याची चौकशी होणार का? याकडे संपूर्ण चिखली तालुक्याचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3336403