बिबी (हॅलो बुलढाणा) सोयाबीन, तूर आणि गहू असा तब्बल १३५.१८ क्विंटल शेतमाल आडत दुकानात विक्रीसाठी दिल्यानंतरही शेतकऱ्याला १० लाख १३ हजार ७५० रुपयांचा मोबदला न दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोणार तालुक्यातील चिखला काकड येथील शेतकरी रामेश्वर श्रीराम मानतकर यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांची बिबी येथील ‘स्वरा ट्रेडिंग कंपनी’च्या संचालकांशी शेती व्यवसायातून ओळख झाली होती. शेतमाल आणल्यानंतर तत्काळ पट्टी करून रोख रक्कम देण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते.
या विश्वासातून मानतकर यांनी १२ मे २०२२ रोजी सोयाबीन, तूर आणि गहू असा एकूण १३५.१८ क्विंटल शेतमाल संबंधित आडतीवर दिला. खर्च वजा जाता या मालाची १० लाख १३ हजार ७५० रुपये रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र, रोख रक्कम न देता पावतीवर ‘बाकी’ लिहून काही दिवसांत पैसे देण्याचे सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे.
वारंवार चकरा मारल्यानंतर १ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्टेट बँक, लोणार शाखेचा १० लाख १३ हजार ७५० रुपयांचा चेक देण्यात आला. मात्र, खात्यात पैसे आल्यानंतर कळवतो असे सांगून तो चेक बँकेत जमा करू दिला नसल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे. पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर १ मार्च २०२३ रोजी डोक्यात दगड मारून जखमी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी एकनाथ नारायण ढगे, विठ्ठल नारायण ढगे आणि पवन एकनाथ ढगे या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० व ३४ अंतर्गत बिबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे











Total Users : 3336598