spot_img
spot_img

ग्रामसेवकांची ‘दांडी’ आता GPSच्या रडारवर! बायोमेट्रिकशिवाय हजेरी नाही; शासनाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदांची होणार परीक्षा

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख)
ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी नेमके कधी येतात आणि किती वेळ थांबतात, याबाबत नागरिकांकडून सातत्याने उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तर मिळणार आहे. ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामविकास अधिकाऱ्यांची हजेरी यापुढे GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविण्याच्या कार्यवाहीला वेग देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना १८ ऑगस्ट रोजी यासंदर्भात पुनःश्च स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ही प्रणाली राबविण्याबाबत शासनाने यापूर्वीच १० डिसेंबर २०२४ रोजी निर्देश दिले होते. मात्र, अनेक ठिकाणी या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याच्या तक्रारी थेट शासनाकडे पोहोचल्या आहेत.

त्यामुळे ग्रामविकास विभागाने आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदांना खडसावत त्यांच्या स्तरावर आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. GPS प्रणालीमुळे संबंधित अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीत उपस्थित आहेत की नाही, हे स्पष्ट होईल; तर बायोमेट्रिकमुळे त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेची अचूक नोंद राहणार आहे.

या प्रणालीमुळे मनमानी हजेरी, उशिरा कार्यालयात येणे आणि कामाच्या वेळेत गायब राहण्याच्या प्रकारांना लगाम बसण्याची अपेक्षा आहे. मात्र, शासनाचा आदेश प्रत्यक्षात राबणार की पुन्हा कागदावरच धूळ खात पडणार, हा खरा प्रश्न आहे. आता बुलढाणा जिल्हा परिषद किती तत्परतेने अंमलबजावणी करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!