spot_img
spot_img

अंगणवाडीतून परतताच घराचा दरवाजा उघडा… कपाटातील सहा लाखांचा ऐवज गायब! पाच वर्षांच्या ‘गौरी’ने पाहिलेल्या त्या व्यक्तीमुळे चोरीचे गूढ उकलणार? साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा हैदोस; संशयित दाम्पत्य ताब्यात, दुचाकीस्वार CCTVत कैद!

सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, सवडद, पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथे दिवसाढवळ्या बंद घरांना लक्ष्य करण्यात आले. सोने आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याच्या या घटना २० ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सवडद येथील श्रीकृष्ण अण्णाराव देशमुख यांच्या आई सुनंदाबाई या घराला कुलूप लावून मुलांना अंगणवाडीत घेऊन गेल्या होत्या. परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि कपाटातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने तसेच ३० हजारांची रोकड गायब असल्याचे आढळले. चोरीच्या ऐवजाची किंमत सुमारे सहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनादरम्यान घरातून एका व्यक्तीला बाहेर पडताना पाच वर्षीय गौरीने पाहिल्याची माहिती आहे. गावातील युवकांनी शोध घेऊन संशयित राज शेनफड शिंदे आणि त्याची पत्नी राधा यांना गुंजमाथा शिवारातून पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र, संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नसून त्यांची भूमिका तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

पिंपळगाव सोनारा येथे कडूबा पुंजाजी कुऱ्हाडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून २० हजार रुपये, तर हिवरा आश्रम येथे शिवाजी हिम्मतराव दळवी यांच्या घरातून ५० हजारांची रोकड लंपास झाल्याची माहिती आहे. संशयित दुचाकीस्वार CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कोराडी प्रकल्पातील दहा मोटारींच्या तांब्याच्या ताराही चोरीला गेल्या आहेत.

महिनाभरापासून चोऱ्यांचे सत्र सुरू असताना जुन्या घटनांचाही छडा लागलेला नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. दुय्यम ठाणेदार संदीप मेधने यांनी घटनास्थळांची पाहणी केली असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!