spot_img
spot_img

घाटबोरी ग्रामसभेत प्रश्नांचा ‘ग्रामस्फोट’! व्यायामशाळेत धान्य, बाजार ओट्यांवर अतिक्रमण अन् नाल्यांत घाण; तरुणांचा सरपंचांना थेट सवाल-ठराव खूप झाले, आता कामाची तारीख सांगा!

घाटबोरी (हॅलो बुलढाणा/ वार्ताहर) मेहकर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील घाटबोरी गट ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रलंबित प्रश्नांवरून चांगलीच वादळी ठरली. ग्रामविकास अधिकारी शरद वानखेडे यांच्या अनुपस्थितीत सरपंच राजकुमार पाखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत तरुणग्रामस्थांनी प्रश्नांचा अक्षरशः भडिमार केला.

सार्वजनिक व्यायामशाळेच्या इमारतीत अन्नधान्याचे गोदाम थाटण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत, “तरुणांसाठी उभारलेली व्यायामशाळा पुन्हा कधी खुली करणार?” असा थेट सवाल करण्यात आला. सार्वजनिक बाजार ओट्यांवरील आणि स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण, बंद पडलेले सौरदिवे, वाड्या-वस्त्यांवरील प्रलंबित रस्ते तसेच अर्धवट नालेसफाईवरून ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले. अनेकदा मागणी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामसभेचे वातावरण काही काळ चांगलेच तापले. सरपंचांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

दरम्यान, व्यायामशाळा खुली करणे, सौरदिवे सुरू करणे, अतिक्रमणे हटविणे, समाजमंदिर दुरुस्ती, नालेसफाई तसेच आयुर्वेदिक उपकेंद्राची जीर्ण इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. मात्र घाटबोरीकरांचा सवाल कायम आहे.ठराव झाले, आता प्रत्यक्ष काम कधी?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!