बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहर अधिक स्वच्छ व्हावे, शहर शासनाच्या स्वच्छता भारत अभियानात अव्वल स्थानी राहावे,ही बुलढाणेकरांची इच्छा असली तरी, शहरातील चौका चौकात व शहराच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे डोंगर उभे राहत असून,अस्वच्छता साचत असल्याने प्रशासनाचे डोके चालत नाही का? की डोक्यात कचरा साचलाय? अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्रशासनाने कचर्यासंदर्भात कितीही जनजागृती, उपाययोजना केल्या तरी रस्त्याकडेला कचर्याचे ढीग पहावयास मिळत आहेत. नागरिक उघड्यावर कचरा आणून टाकत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने या कचर्याचे करायचे काय? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर येणारा कचरा बंद व्हावा यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत असते. स्वच्छतेसाठी कोट्यवधी रूपये खर्ची पडत असताना. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शहराच्या प्रवेशद्वारासह विविध मार्गाच्या कडेला कचर्याचे ढीगच्या ढीग पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिक घरातून येताना कचर्याची पिशवी घेऊन येत असतात. पूल दिसला, कचर्याचा ढीग दिसला किंवा नदी दिसली की कचरा टाकतात. अशी नागरिकांची तर्हा पाहावयास मिळत आहे. पूल परिसरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पाहावयास मिळत आहेत. तसेच कचरा कुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. हा कचरा वार्यामुळे रस्त्यावर पसरत आहे. कचर्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. ही कुत्री काहीवेळा दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात. त्यामुळे अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय कचर्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
▪️मकरंद आबा लक्ष कधी द्याल?
बुलढाणा शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर साठलेला प्रचंड कचरा, मोकाट गुरेढोरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आणि प्रशासकीय यंत्रणेची अनास्था
शहरासाठी दुर्दैवी आहे.या संदर्भात पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांना राधेश्याम चांडक यांनी निवेदन देऊन उपाययोजना करण्याचीमागणी केली आहे. प्रशासन मालमत्ता कर घेते परंतु मूलभूत सुविधा देत नसल्याची ओरड आहे. शहरांशी जोडणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांवर प्रचंड कचरा साठलेला दिसून येतो. हा कचरा या ठिकाणी कुठून येतो याचा शोध घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.मोकाट गुरेढोरे व मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही नगरपालिका व संबंधित अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या गंभीर विषयाकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष वेधणे गरजेचे आहे.











Total Users : 3319128