spot_img
spot_img

BIG EXPOSE! ५० टक्के सवलतीच्या आड ‘शुल्काची कात्री’? NCMC कार्डमध्ये ₹५०० भरले… प्रत्यक्ष जमा फक्त ₹४८२.८९! सुविधा शुल्क आणि GSTच्या नावाखाली महाराष्ट्रातील लाखो महिलांकडून नेमकी किती वसुली? MSRTC संपूर्ण हिशेब जाहीर करणार का?

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) महिलांचा एसटी प्रवास स्वस्त करण्यासाठी शासनाने ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत ५० टक्के सवलत दिली; मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक NCMC स्मार्ट कार्डमध्ये पैसे भरतानाच सुविधा शुल्क आणि GSTची कात्री लागत असल्याचा धक्कादायक प्रकार सिंदखेडराजात समोर आला आहे.

शहरातील एका महिलेने ३० जुलै रोजी NCMC कार्ड काढले. त्यासाठी १९९ रुपये घेण्यात आले. पावतीनुसार १६८ रुपये कार्ड नोंदणी शुल्क आणि ३१ रुपये GST आकारण्यात आला. त्यानंतर कार्डमध्ये ५०० रुपयांचा टॉप-अप करताना १४.५० रुपये सुविधा शुल्क आणि २.६१ रुपये GST कापण्यात आला. म्हणजे ५०० रुपये भरूनही कार्डात प्रत्यक्ष केवळ ४८२.८९ रुपये जमा झाले! सवलत देतानाच दुसऱ्या मार्गाने प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली जात आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.

३० जून २०२६पर्यंत राज्यात तब्बल ६२ लाख ८६ हजार ७६५ NCMC कार्डांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ३५ लाख ५२ हजार ३३२ कार्ड सक्रिय आहेत. या लाखो कार्डधारकांनी केलेल्या रिचार्जमधून किती सुविधा शुल्क वसूल झाले? त्यावर किती GST आकारला? ही रक्कम MSRTCच्या तिजोरीत जाते, अधिकृत एजंटकडे की खासगी सेवा पुरवठादाराकडे याचा अधिकृत हिशेब अद्याप जनतेसमोर का नाही?

विशेषतः महिला सन्मान योजनेच्या किती लाभार्थींना हे शुल्क भरावे लागले, त्यांच्याकडून एकूण किती रक्कम वसूल झाली आणि त्यांना शुल्कमाफी का नाही, याचा खुलासा होणे आवश्यक आहे.

एका महिलेच्या पावतीने राज्यव्यापी प्रश्नाला तोंड फोडले आहे. ५० टक्के सवलत देणारे शासन NCMC रिचार्जवरील ‘अतिरिक्त वसुली’ थांबवणार की लाखो प्रवाशांच्या पैशांचा संपूर्ण हिशेब जाहीर करणार?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!