सोनाळा, दि. १९ ऑगस्ट २०२६ (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) सर्वसामान्य आणि अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणारे संग्रामपूर तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार, उद्योजक, कास्तकार तथा समाजसेवक किशोरभाऊ खडे यांचे बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण संग्रामपूर तालुक्यासह पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्राला जबर धक्का बसला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोनाळा-हिवरखेड मार्गावरील कारला गावाजवळ मोटरसायकल आणि स्कुटीचा अपघात झाला. या दुर्घटनेत किशोरभाऊ खडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
किशोरभाऊ खडे यांनी आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि अन्यायग्रस्तांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. प्रशासनाला जाब विचारणारी आणि वंचितांचा आवाज बुलंद करणारी त्यांची लेखणी आता कायमची थांबली आहे.
पत्रकारितेबरोबरच उद्योजक, कास्तकार आणि समाजसेवक म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकाली निधनाने संग्रामपूर तालुक्याने एक संवेदनशील पत्रकार आणि समाजहितासाठी झटणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. किशोरभाऊ खडे यांना हॅलो बुलढाणा परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली!















Total Users : 3316810