चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) देवदर्शनासाठी दुचाकीने निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा प्रवास अखेरचा ठरल्याची हृदयद्रावक घटना इसोली–धोत्रा मार्गावर घडली. रस्त्यालगतच्या तब्बल ९० फूट खोल दरीत दुचाकीसह कोसळल्याने गौतम विजय गवई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने इसोली गावावर शोककळा पसरली आहे.
इसोली, ता. चिखली येथील रहिवासी गौतम विजय गवई (वय ३०) हे दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुचाकीने देवदर्शनासाठी निघाले होते. इसोली–धोत्रा मार्गावरून जात असताना एका ठिकाणी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात दुचाकी रस्त्यालगतच्या सुमारे ९० फूट खोल दरीत कोसळली. खोल दरी आणि भीषण अपघातामुळे गौतम गवई यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही तत्काळ माहिती देण्यात आली. गौतम गवई यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
अपघात नेमका कशामुळे घडला, दुचाकी घसरली की रस्त्यावरील अन्य कारण कारणीभूत ठरले, याचा तपास सुरू आहे. अमडापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दिलीप तोंडे पुढील तपास करीत आहेत.















Total Users : 3309395