spot_img
spot_img

मेहकर तालुक्यातील मांडवा उपकेंद्रात झेंड्याला सलामी… देऊळगाव साकर्शात वरिष्ठांकडे राजीनामा; गोहोगाव हाडेत काही तासांत उचलले ‘ते’ टोकाचे पाऊल! सीएचओ डॉ. संदीप हाडेंवर नेमका कोणाचा होता दबाव? आत्महत्येने आरोग्य यंत्रणेतील ‘ताणाचा आजार’ चव्हाट्यावर!

डोणगाव (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील गोहोगाव हाडे येथे वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. मांडवा फॉरेस्ट आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप प्रकाशराव हाडे (वय ३७) यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यानंतर गावी गळफास घेऊन आत्महत्या केली. कामाचा वाढता ताण, अपुऱ्या सुविधा आणि वरिष्ठांच्या कथित प्रशासकीय दबावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे.

डॉ. हाडे हे चार महिन्यांपासून देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रात कार्यरत होते. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी उपकेंद्रात राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांच्याकडे राजीनामा सादर केला. मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे त्यांनी राजीनाम्यात नमूद केल्याची माहिती डॉ. राठोड यांनी दिली. त्यांची समजूत घालून कोणताही ताण घेऊ नका, असे सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मांडवा उपकेंद्राचे चार-पाच दिवसांत ‘एनक्यूएएस’ मूल्यांकन होणार होते. आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री आणि मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही सर्व निकष पूर्ण करण्याची जबाबदारी डॉ. हाडे यांच्यावर टाकण्यात आल्याचा संघटनेचा आरोप आहे. नेमका दबाव कोणाचा होता? कोणत्या अशक्य जबाबदाऱ्या त्यांच्यावर लादण्यात आल्या? राजीनामा दिल्यानंतरही यंत्रणा वेळीच का जागी झाली नाही? असे संतप्त प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृहजिल्ह्यात आणि मेहकर मतदारसंघात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी बाहेर जिल्ह्यातील समितीकडून जलदगतीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. चार-पाच दिवसांत न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला असून आमदार सिद्धार्थ खरात यांनाही निवेदन देण्यात आले आहे. आता चौकशीमध्ये सत्य बाहेर येते की प्रकरण फाईलमध्ये दडपले जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!