धामणगाव बढे (एस. बि. शेख/हॅलो बुलढाणा) नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलिसांची मदत मिळावी, यासाठी डायल 112 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, या क्रमांकाचा गैरवापर करून दारूच्या नशेत खोटी माहिती देणाऱ्या शेलापूर येथील 27 वर्षीय तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 25 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता प्रमोद पांडुरंग सुरडकर (वय 27, रा. शेलापूर) याने दारूच्या नशेत डायल 112 क्रमांकावर फोन करून खोटी घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोहेकॉ दिलीप तडवी (ब.नं. 978) व पो.का. संदीप ढोले (ब.नं. 2499) यांनी घटनास्थळी पोहोचून माहितीची शहानिशा केली.
यावेळी कोणतीही घटना घडली नसल्याचे तसेच संबंधित व्यक्तीने दारूच्या नशेत विनाकारण डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी प्रमोद पांडुरंग सुरडकर याच्याविरुद्ध अप. क्र. 385/2026 अन्वये कलम 85 महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 सह कलम 212 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ दिलीप तडवी (ब.नं. 978), बोरखेडी हे करीत आहेत.
डायल 112 हा नागरिकांच्या मदतीसाठी असलेला आपत्कालीन क्रमांक असून, त्यावर खोटी अथवा विनाकारण माहिती देणे टाळावे, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.















Total Users : 3297691