spot_img
spot_img

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिवंगत भावाच्या नावाच्या लेआउटची स्थिती बिकट! पंजाबराव नगरात विकास हरवला; रस्ता नाही, गटारी नाहीत, नळ नाहीत! कोट्यवधींच्या विकासाच्या दाव्यांचा नगर पालीकेचा फोलपणा उघड!

मेहकर (अयाज़ शाह/हॅलो बुलढाणा) एकीकडे मेहकर नगर परिषद शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे दावे करत असताना, दुसरीकडे शहरातील पंजाबराव नगर लेआउट आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे.

या परिसरात पक्के रस्ते नाहीत, गटारींची व्यवस्था नाही आणि नियमित पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध नाही. पावसाळ्यात संपूर्ण परिसर चिखलमय होत असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शाळकरी मुलांना बसत आहे. विद्यार्थ्यांना दररोज चिखल आणि घाणीमधून शाळेत जावे लागत असून त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात हा परिसर एखाद्या दलदलीसारखा दिसतो. विशेष म्हणजे या लेआउटला दिवंगत पंजाबराव जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. ते भारत सरकारचे केंद्रीय आयुष मंत्री तथा बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू होते. स्वतः खासदार प्रतापराव जाधव हे मेहकर शहराचे रहिवासी असतानाही त्यांच्या कुटुंबाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लेआउटची झालेली दयनीय अवस्था नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
लेआउटमधील रहिवाशांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते, गटारी आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. “आम्ही आणखी किती दिवस अशाच हालअपेष्टांमध्ये राहायचे?” असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.स्थानिकांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. निवडणुकांच्या वेळी विकासाची मोठी आश्वासने दिली जातात; मात्र निवडणुका संपल्यानंतर नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जातात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.आता कोट्यवधींच्या विकासाच्या घोषणा करणारी नगर परिषद आणि संबंधित लोकप्रतिनिधी पंजाबराव नगर लेआउटच्या या गंभीर समस्यांकडे कधी लक्ष देतात, की येथील नागरिकांना पुढेही चिखल, अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावातच जीवन जगावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!