जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) मोळी येथील नागेश्वर महादेव मंदिराची दानपेटी फोडून भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेली रोकड आणि दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला अवघ्या ४८ तासांत जेरबंद करणाऱ्या जानेफळ पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुकाची मोहर उमटवली आहे. या उल्लेखनीय तपासाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मंदिरातील चोरीनंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र जानेफळ पोलिसांनी CCTV फुटेजमधील संशयास्पद हालचालींचा बारकाईने मागोवा घेतला. गोपनीय माहितीचे जाळे सक्रिय करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि सावत्रा येथील आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून रोकड, सोन्या-चांदीचे नाग, मोबाईल, स्प्लेंडर दुचाकी आणि दानपेटी फोडण्यासाठी वापरलेले लोखंडी गज असा एकूण १ लाख ९८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईबद्दल सहायक पोलीस निरीक्षक शरद माळी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बाबूसिंग जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहन रामदास सावंत, तसेच पोलीस कर्मचारी भागवत कुंडलिक पाटोळे, कृष्णा अशोक निकम आणि माधव कौरू काळे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. चोरट्यांचे बिंग फोडणाऱ्या या ‘खाकी’च्या वेगवान प्रहाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.










Total Users : 3290967