बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सणासुदीच्या तोंडावर बुलढाणा शहरात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या “सीताश्री-लक्ष्मीनारायण” कंपनीच्या काजूकतलीच्या बॉक्समध्ये चक्क बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोड पदार्थाच्या नावाखाली ग्राहकांना नेमके काय विकले जात आहे, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
प्राप्त तक्रारीनुसार, संबंधित काजूकतलीचा बॉक्स उघडताच त्यातील मिठाईवर बुरशी पसरलेली आणि अळ्या वळवळताना दिसून आल्या. उत्पादनावरील बॅच/बारकोड क्रमांक 8906151422017 असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार निदर्शनास येताच अन्न व औषध प्रशासनाकडे तातडीने तक्रार करण्यात आली.
तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी जि. के. वसावे यांच्या नेतृत्वाखाली FDA बुलढाण्याच्या पथकाने तत्काळ संबंधित ठिकाणी धडक देत कारवाई केली. पथकाने उत्पादन आणि उपलब्ध साठ्याची तपासणी सुरू केल्याची माहिती आहे.
दरम्यान, ही काजूकतली किती दिवसांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आली होती? अशाच प्रकारचे आणखी किती बॉक्स ग्राहकांच्या घरात पोहोचले? उत्पादनाची साठवणूक आणि कालबाह्यता नियम पाळण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आणि FDAच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










Total Users : 3256410