बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पावसाच्या संततधारेमुळे मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प ५६.५१ टक्के भरला आहे.या प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास प्रकल्पाची वक्रव्दारे उघडून पैनगंगा नदीमध्ये विसर्ग सोडावा लागला तर नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या परीसरातील सर्व नागरीकांना सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा यंत्रणेने दिला आहे.
गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. पेनटाकळी प्रकल्पात आज दिनांक ३१ जुलै रोजी ५६.५१ टक्के पाणी साठा जमा झालेला आहे. प्रकल्पाच्या मंजुर जलाशय व व्दार परीचालन सुची नुसार माहे जुलै अखेर धरणात ६९ टक्के जलस्तर कायम ठेवून धरणाच्या पानलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास व प्रकल्पाच्या उर्ध्व बाजुस असणाऱ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता
आहे. सदरची पाण्याची आवक लक्षात घेऊन पुरनियंत्रण करीता पेनटाकळी प्रकल्पाची वक्रव्दारे उघडून पैनगंगा नदीमध्ये विसर्ग सोडावा लागण्याची शक्यता आहे. सदरच्या विसर्गामुळे पेनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मेहकर तालुक्यातील नदीकाठ परिसरात पेनटाकळी, दुधा,ब्रम्हपुरी, रायपुर, बाहई, पाचला, भालेगाव, गौढाळा, कंबरखेड, नेमतापुर, फर्दापुर, मेहकर, सारंगपुर, अंत्री देशमुख, बोरी, सोनाटी, नांद्रा, गणपूर या गावांचा समावेश आहे. तरी नदी काठच्या परीसरातील सर्व नागरीकांना सतर्क राहण्याबाबत तसेच चल मालमत्ता, चिजवस्तू, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी व शेती अवजारे इ. सामग्री सुरक्षीत स्थळी हलविण्या बाबत दवंडीव्दारे, मुनादीव्दारे सरपंच यांनी नागरिकांना सुचीत करावे व पुरापासून सावध राहावे,असा इशारा पेण टाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभागाचे अ. श्री. नागरे यांनी दिला आहे.











Total Users : 3208082