डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनी बुद्रुक येथे अवैधरीत्या पेट्रोलचा मोठा साठा करून चढ्या भावाने विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २७० लिटर पेट्रोलचा ज्वालाग्राही साठा जप्त करण्यात आला असून, संशयित आरोपी भागवत लाड याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील भागात भागवत लाड याचे दैनंदिन वस्तूंचे दुकान आहे. या दुकानातून बेकायदेशीरपणे पेट्रोलची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती डोणगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दुकानावर छापा टाकला असता २० लिटरच्या कॅनमधून तसेच पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर पोलिसांनी लाड याच्या राहत्या घराची तपासणी केली. तेथे २० ते ४० लिटर क्षमतेच्या विविध कॅनमध्ये साठवलेले तब्बल २७० लिटर पेट्रोल आढळून आले. भरवस्तीतील घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही पदार्थाचा साठा असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांनी पेट्रोलचे नमुने घेतले असून पुढील कारवाईसाठी पुरवठा विभागाला माहिती देण्यात येणार आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश इंगोले, पोलीस निरीक्षक विजय अजमेरे, पोलीस कर्मचारी पवन गाभणे, जाकिर आणि अरुण सरदार यांच्या पथकाने केली.











