नवी दिल्ली/मेहकर (हॅलो बुलढाणा) देशभरातील विद्यार्थ्यांनी अन्यायाविरोधात उभारलेल्या अभूतपूर्व आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले! नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईमुळे पेटलेल्या संतापाच्या वणव्याने दिल्लीचे सत्ताकेंद्र हादरले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज शनिवार, २५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
याच निर्णायक दिवशी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनस्थळी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनाचे प्रमुख चेहरे अभिजीत दिपके, आशुतोष राणा आणि सौरभ दास यांची भेट घेऊन, “मेहकर मतदारसंघातील जनता विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात खंबीरपणे उभी आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
विशेष म्हणजे, आमदार सिद्धार्थ खरात यांनी जंतर-मंतरवर पाऊल ठेवले आणि अवघ्या काही क्षणांतच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी आंदोलनस्थळी धडकली! ही बातमी समजताच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एकच जल्लोष उसळला. अनेक दिवसांपासून आंदोलनाची धुरा सांभाळणारे अभिजीत दिपके या घडामोडीने प्रचंड खूश झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आंदोलनाच्या यशाचा आनंद स्पष्टपणे झळकत होता. त्यांनी सहकाऱ्यांसोबत आनंद व्यक्त करत हा विजय देशातील प्रत्येक संघर्षशील विद्यार्थी आणि युवाशक्तीचा असल्याचे सांगितले.
आमदार खरात यांच्या उपस्थितीतच राजीनाम्याची बातमी आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले. “मेहकरच्या आमदारांचे पायगुण चांगले ठरले! खरातांनी जंतर-मंतरवर पाऊल ठेवताच मोठी विकेट पडली,” अशा प्रतिक्रिया आंदोलनस्थळी उमटू लागल्या.
हा राजीनामा म्हणजे केवळ एका मंत्र्याची माघार नाही, तर अन्यायाविरोधात एकवटलेल्या युवाशक्तीचा ऐतिहासिक विजय आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्तेला अखेर जनआक्रोशाची ताकद मान्य करावी लागली. मात्र, विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केली.
हॅलो बुलढाणाकडून देशातील सर्व आंदोलक विद्यार्थी, युवक आणि या न्यायलढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक संघर्षशील आवाजाचे मनःपूर्वक अभिनंदन!











