बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कागदोपत्री प्रक्रिया, कायदेशीर अटी आणि प्रशासकीय चौकटीच्या पलीकडे जाऊन एका अनाथ चिमुकलीच्या आयुष्याला मायेची ऊब, सुरक्षित भविष्य आणि हक्काचे आई-वडील मिळवून देणारा ऐतिहासिक निर्णय बुलढाणा जिल्ह्यात घेण्यात आला आहे. दत्तक विधान नियमावली २०२२ अंतर्गत जिल्ह्यातील पहिला दत्तक विधान आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी पारित केला.
या संवेदनशील आणि दूरगामी निर्णयामुळे एका निराधार चिमुकलीला प्रेमळ कुटुंब लाभले, तर अनेक वर्षांपासून पालकत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या दाम्पत्याच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश पडला. बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, सर्व कायदेशीर तरतुदींची काटेकोर पूर्तता करून जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी प्रक्रियेला अंतिम मंजुरी दिली.
प्रशासकीय अधिकाराचा वापर केवळ फाईल निकाली काढण्यासाठी नव्हे, तर एका निष्पाप जीवाचे भविष्य घडविण्यासाठी कसा करावा, याचा आदर्श डॉ. देवरे यांनी घालून दिला आहे.
महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दत्तक संस्था आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून ही प्रक्रिया पूर्ण झाली. पात्र दाम्पत्यांनी अधिकृत दत्तक प्रक्रियेचा अवलंब करून निराधार बालकांना हक्काचे कुटुंब द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे










